Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

श्रीरामपूरमध्ये बेकायदेशीर भंगार दुकानांवर मोठी कारवाई;

श्रीरामपूरमध्ये बेकायदेशीर भंगार दुकानांवर मोठी कारवाई; दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशाने विशेष मोहीम;विनापरवाना वाहने तोडणाऱ्या भंगार दुकानदारांवर गुन्हे दाखल

श्रीरामपूर | शिव वार्ता प्रतिनिधी : बापूसाहेब नवले 

श्रीरामपूर शहरातील बेकायदेशीर भंगार दुकानांवर कारवाई करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या आदेशानुसार श्रीरामपूर शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. चोरीच्या किंवा विविध गुन्ह्यांत वापरलेल्या वाहनांची बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावली जात असल्याच्या संशयावरून करण्यात आलेल्या तपासात तीन भंगार दुकानांमध्ये संशयास्पद वाहने आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी शकील इब्राहिम शहा आणि सुलेमान दादामिया शहा या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर भंगार दुकानांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान पाण्याच्या टाकीजवळील परिसर तसेच श्रीरामपूर येथील गोपीनाथनगर परिसरातील भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली.

तीन भंगार दुकानांमध्ये संशयास्पद वाहने

पोलिसांच्या तपासणीदरम्यान शकील इब्राहिम शहा यांच्या मालकीच्या भंगार दुकानात विविध प्रकारची वाहने आढळून आली. त्यामध्ये मारुती अल्टो, मारुती स्प्रिट, टाटा सुमो, टाटा मॅजिक, टाटा इंडिका तसेच मोटारसायकल आदी वाहनांचा समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

तसेच सुलेमान दादामिया शहा यांच्या भंगार दुकानात वॅगनर, मारुती अल्टो, वॅगनर कार आणि ओम्नी कार अशी वाहने आढळली. तर आसिफ हारुण शहा यांच्या भंगार दुकानातही विविध वाहने आढळून आली.

या वाहनांबाबत संबंधित मालकांकडे कागदपत्रांची विचारणा करण्यात आली. मात्र काही वाहनांच्या मालकीबाबत समाधानकारक कागदपत्रे अथवा स्पष्टीकरण उपलब्ध झाले नसल्याचे पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

वाहनांची कागदपत्रे नसल्याने पोलिसांचा संशय

पोलिसांच्या तपासात संबंधित वाहनांच्या मालकीबाबत आवश्यक पुरावे उपलब्ध नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच वाहने तोडून स्क्रॅप करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाची (RTO) आवश्यक परवानगी घेतली नसल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या वाहनांचा मूळ मालकी हक्क, खरेदी-विक्री तसेच वाहनांची विल्हेवाट याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणातील शकील इब्राहिम शहा (वय ४९, रा. पाण्याच्या टाकीजवळ, वॉर्ड क्रमांक २, श्रीरामपूर) आणि सुलेमान दादामिया शहा (वय ४५, रा. संजयनगर, वॉर्ड क्रमांक २, श्रीरामपूर) यांना पोलिसांनी अटक केली.

दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता अधिक वेग येण्याची शक्यता आहे.

भंगार व्यावसायिकांना पोलिसांचे आवाहन

पोलिसांनी भंगार व्यावसायिकांना वाहन खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुकानात येणाऱ्या जुन्या वाहनाची आरसी बुक, खरेदी-विक्रीचे कागदपत्रे, आधार ओळखपत्र तसेच वाहनाचा चेसीस व इंजिन क्रमांक यांची योग्य नोंद रजिस्टरमध्ये ठेवणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

तसेच RTOच्या अधिकृत परवानगीशिवाय कोणत्याही वाहनाची तोडफोड करून स्क्रॅप करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद, विनानंबर किंवा अत्यंत कमी किमतीत वाहन विक्रीसाठी आणले गेल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिसांनी केली.श्रीरामपूरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!