
श्रीरामपूरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर
टाकळीभान प्रतिनिधी | बापुसाहेब नवले
श्रीरामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता अधिक आक्रमक पवित्रा घेतला असून, संपूर्ण यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे. युवा उद्योजक आकाश दुबैय्या यांच्या ११ जुलै रोजी झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर शहरातील परिस्थितीचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला.
राज्याचे अपर पोलीस महासंचालक डॉ. निखिल गुप्ता तसेच एसआयडी विभागाचे प्रमुख शिरीष जैन यांनी श्रीरामपूरला भेट देऊन शहरातील कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारी परिस्थिती आणि सुरू असलेल्या तपासाचा आढावा घेतला. या भेटीमुळे पोलीस प्रशासनाने श्रीरामपूरमधील परिस्थिती गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक खैरे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान श्रीरामपूर शहरातील सध्याची कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना तसेच नागरिकांच्या सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवणे, संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे आणि कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांची गस्त व बंदोबस्त अधिक प्रभावी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आकाश दुबैय्या यांच्या हत्येच्या तपासाबाबतही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तपासाची गती कायम ठेवून उपलब्ध पुरावे, तांत्रिक माहिती आणि इतर सर्व बाबींच्या आधारे तपास पुढे नेण्याचे निर्देश देण्यात आले. आकाश दुबैय्या यांची हत्या
दरम्यान, हत्येच्या घटनेनंतर शहरात कोणत्याही प्रकारचे तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलिसांकडून नियमित गस्त वाढविण्यात आली आहे.
श्रीरामपूर शहरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा माहिती आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, हे पोलीस प्रशासना समोरील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.













