नाऊर येथे स्व. अजित पवार यांची जयंती; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, फारूख पटेल यांचे भावनिक मनोगत
नाऊर | प्रतिनिधी
नाऊर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिवंगत स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा आणि सद्गुरू गंगागिरी विद्यालयाला स्व. अजित पवार यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.
या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव फारूख पटेल यांनी स्व. अजित पवार यांच्या कार्याची आठवण करून देत सांगितले की, “स्व. अजित पवार हे राज्यभर दांडगा जनसंपर्क असलेले आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी मंत्रालयापर्यंत धाव घेणारे अष्टपैलू नेतृत्व होते. ते स्वभावाने कडक असले तरी मनाने अत्यंत निर्मळ होते. पहाटेपासून कामाला सुरुवात करून लोकांच्या समस्या तत्परतेने सोडवणारे नेतृत्व आज हरपल्याची खंत कायम राहील.” भावनिक आठवणी सांगताना त्यांना गहिवरून आले. अजितदादा पवार जयंती निमित्त वृक्षारोपण
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दिलीप देसाई होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोकुळ देसाई, माजी सरपंच संभाजी शिंदे, सेवानिवृत्त शिक्षक सोन्याबापू शिंदे, माजी उपसरपंच हाजी मुसाभाई पटेल, उपसरपंच अनिताताई शिंदे, प्रितीश देसाई, नारायण वाघचौरे, अरुण शिंदे, बापूसाहेब चौधरी, संतोष वाघचौरे, शगिर पटेल, अशोक नानेकर, अरविंद नागळ आणि ग्रामविकास अधिकारी प्रेमचंद वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुठेवाडगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
या कार्यक्रमात सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोकुळ देसाई यांनी आपल्या मनोगतात स्व. अजित पवार यांनी शिक्षण, जलसंधारण, ग्रामविकास आणि विविध विकासकामांमध्ये दिलेल्या योगदानाचा गौरव केला. अनेक वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणारे, शिस्तप्रिय आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख कायम राहील, असे त्यांनी नमूद केले.
सेवानिवृत्त शिक्षक सोन्याबापू शिंदे यांनीही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी प्रितेश देसाई आणि संतोष वाघचौरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रताप शिंदे, संतोष शिंदे, सुमित गायकवाड आणि शुभम शिंदे यांनी केले.
विशेष
शालेय साहित्य वाटपाचा हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाशदादा आदिक तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव फारूख पटेल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.













