ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल मुठेवाडगाव येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
टाकळीभान | प्रतिनिधी : बापूसाहेब नवले
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, मुठेवाडगाव येथे सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला
या उपक्रमांतर्गत शाळेतील शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी कार्य करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास प्रमुख प्रतिनिधी म्हणून श्री. धनवटे सर व श्री. शिंदे सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नियमित अभ्यास, शिस्त आणि मेहनतीच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. महेश काशीद होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिक्षण, ग्रामीण विकास व सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून आयोजकांचे आभार मानले.
या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळाला असून वाढदिवस समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्याचा आदर्श संदेशही देण्यात आला.













