नोंदणीकृत परिचारिकांसाठी मोठा दिलासा! नोंदणी नूतनीकरणासाठी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने (MNC) राज्यातील नोंदणीकृत परिचारिका (Registered Nurses) आणि नोंदणीकृत प्रसूतिका (Registered Midwives) यांना मोठा दिलासा देणारे परिपत्रक जारी केले आहे. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२७ या नोंदणी नूतनीकरण कालावधीसाठी CNE/CPD क्रेडिट तासांबाबत एकदाच लागू होणारी विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या नियमानुसार, प्रत्येक नोंदणीकृत परिचारिकेला नोंदणी नूतनीकरणासाठी १५० CNE/CPD क्रेडिट तास पूर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र, विविध नर्सिंग संस्था व संघटनांकडून आलेल्या मागण्यांचा विचार करून कौन्सिलने संक्रमणकालीन (Transitional) स्वरूपाची विशेष सवलत दिली आहे.
३० क्रेडिट असलेल्यांनाही नूतनीकरणाची संधी NHM सेवा ज्येष्ठता यादी ३१ जुलैपर्यंत हरकती
ज्या परिचारिकांनी काही प्रमाणात CNE/CPD क्रेडिट मिळवले आहेत, पण १५० क्रेडिट पूर्ण केलेले नाहीत, त्यांना ३१ मार्च २०२७ पूर्वी किमान ३० क्रेडिट तास पूर्ण केल्यास नोंदणी नूतनीकरण करता येणार आहे. उर्वरित क्रेडिट पुढील नूतनीकरण चक्रात पूर्ण करावे लागतील आणि ते पुढील चक्रातील अनिवार्य क्रेडिटमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
एकही क्रेडिट नसलेल्यांनाही दिलासा
ज्या नोंदणीकृत परिचारिकांनी अद्याप एकही CNE/CPD क्रेडिट मिळवलेले नाही, त्यांनाही या विशेष सवलतीचा लाभ मिळणार आहे. अशा परिचारिकांनी ३१ मार्च २०२७ पर्यंत किमान ५० क्रेडिट तास पूर्ण करून तसेच उर्वरित क्रेडिट पुढील चक्रात पूर्ण करण्याचे हमीपत्र (Undertaking) दिल्यास नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. मात्र, हमीपत्रातील अटींचे पालन न केल्यास पुढील नूतनीकरणात अडचणी निर्माण होऊ शकतात.
नव्याने नोंदणी झालेल्यांसाठी वेगळी तरतूद NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांची 10 वर्षे सेवा यादी प्रसिद्ध
१ एप्रिल २०२२ नंतर प्रथमच नोंदणी झालेल्या परिचारिकांसाठी प्रमाणानुसार (Proportionate) क्रेडिट तासांची अट लागू करण्यात आली आहे. नोंदणीच्या वर्षानुसार ३० ते १५० क्रेडिट तासांची आवश्यकता राहणार आहे.
ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रशिक्षणाचा समतोल
राज्यात वास्तव्यास असलेल्या परिचारिकांनी आवश्यक क्रेडिटपैकी किमान ६० टक्के क्रेडिट ऑफलाइन प्रशिक्षणातून मिळवणे आवश्यक आहे. उर्वरित ४० टक्के क्रेडिट ऑनलाइन प्रशिक्षणातून मिळवता येतील. मात्र, इच्छुक परिचारिका १०० टक्के क्रेडिट ऑफलाइन कार्यक्रमातूनही मिळवू शकतात. राज्याबाहेर किंवा परदेशात राहणाऱ्या परिचारिकांना १०० टक्के ऑनलाइन क्रेडिट मिळवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
शासकीय प्रशिक्षणालाही मान्यता
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), आरोग्य सेवा संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER), जिल्हा परिषद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालये, महानगरपालिका तसेच इतर शासकीय आरोग्य संस्थांमार्फत आयोजित इन-हाऊस प्रशिक्षण कार्यक्रमांनाही महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून मंजुरीनंतर CNE/CPD क्रेडिट दिले जाणार आहेत.
प्रत्येक कार्यक्रमासाठी क्रेडिट दुप्पट
परिचारिकांना १५० क्रेडिट पूर्ण करणे सोपे व्हावे यासाठी कौन्सिलने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एका मंजूर CNE/CPD कार्यक्रमासाठी ५ क्रेडिट तास दिले जात होते. आता ते १० क्रेडिट तास करण्यात आले आहेत. ही सुधारित तरतूद ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू राहणार आहे. मात्र, एकूण १५० क्रेडिटची अनिवार्य अट कायम ठेवण्यात आली आहे.
तत्काळ अंमलबजावणी
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने हे परिपत्रक तात्काळ प्रभावाने लागू केले असून, सर्व नोंदणीकृत परिचारिका, नर्सिंग महाविद्यालये, रुग्णालये आणि CNE/CPD कार्यक्रम आयोजकांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.












