Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

राहाता येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

राहाता येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर पोलिसांची कारवाई

दोन ब्रास वाळूसह दोघांवर गुन्हा; अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

शिव वार्ता ! बापूसाहेब नवले

राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर पोलिसांनी कारवाई करत वाहनासह एकूण १५ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईला यामुळे आणखी वेग आला आहे

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे राहाता परिसरात बेकायदेशीररीत्या वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

राहाता येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर पोलिसांची कारवाई

२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या गस्तीच्या दरम्यान अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर येथील पोलीस पथकाला राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली.

 

पुणतांबा गावाच्या शिवारातून एक डंपर अवैधरित्या वाळू वाहतूक करून राहात्याकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलीस पथक तत्काळ संबंधित ठिकाणी रवाना झाले.

आशाकेंद्र चौकाजवळ डंपर अडवला

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार पुणतांबा येथे पोहोचून राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार पोहेकॉ. राजेंद्र बर्डे आणि पोको. वाघ यांना सोबत घेतले. त्यानंतर पोलिसांनी आशाकेंद्र चौकाजवळ रोडलगत सापळा लावला.

काही वेळाने पुणतांबाकडून राहात्याच्या दिशेने एक विना क्रमांकाचा टाटा कंपनीचा पिवळ्या व राखाडी रंगाचा डंपर येताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी इशारा करून वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले.

वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सुनील भिका पवार (वय ४६, रा. पिंपळवाडी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) असे सांगितले.

वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे स्पष्ट

पोलिसांनी डंपरमध्ये काय आहे, याची विचारणा केली असता वाहनात वाळू भरलेली असल्याचे चालकाने सांगितले. तसेच वाळू वाहतुकीसाठी आवश्यक असलेला वैध परवाना आहे का, अशी विचारणा केली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा वैध परवाना नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संबंधित वाहनमालकाचे नाव विकास गोंदकर, रा. शिर्डी (फरार) असल्याचे समोर आले.

१५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईत विना क्रमांकाचा टाटा कंपनीचा पिवळ्या व राखाडी रंगाचा डंपर आणि दोन ब्रास वाळू, असा एकूण १५ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला.

या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहाता पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोहेकॉ. सचिन धनाड, रामेश्वर वेताळ, अनिल शेंगाळे, पोको. अक्षय भोसले, तसेच राहाता पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. राजेंद्र बर्डे आणि पोको. वाघ यांनी सहभाग घेतला.

अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे महसूल बुडवून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.  असा एकूण १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

श्रीरामपूर पोलिसांची स्कूल बस वाहनांवर कारवाई

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!