विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी श्रीरामपूर पोलिसांची विशेष मोहीम; ६६ स्कूल बस व वाहनांची तपासणी, ३३ वाहनांवर कारवाई
शिव वार्ता प्रतिनिधी! बापूसाहेब नवले
स्कूल बस, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये नियमभंग; फिटनेस, परवाना, सुरक्षा साधने, अग्निशामक यंत्रांसह चालकांची तपासणी
श्रीरामपूर : विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलिस, शिर्डी वाहतूक शाखा आणि श्रीरामपूर आरटीओ विभागाच्या संयुक्त विद्यमाने ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ११ वाजेपर्यंत स्कूल बस व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या इतर वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ६६ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे तसेच श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त मवर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्कूल बसच्या सुरक्षिततेवर पोलिसांचा भर
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करताना वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, विमा, परमिट, प्रदूषण प्रमाणपत्र, चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना, वाहनातील सुरक्षा साधने, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी, आपत्कालीन दरवाजा, सीसीटीव्ही/जीपीएस सुविधा तसेच वेगमर्यादा आदी बाबी तपासण्यात आल्या.
याशिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चालकाची भूमिका महत्त्वाची असल्याने चालकाला ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, तसेच तो मद्य किंवा इतर अमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवत नाही ना, याबाबतही तपासणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आदी बाबींवरही पोलिसांनी विशेष लक्ष दिले.
६६ वाहनांची तपासणी; ३३ वाहनांवर दंडात्मक कारवाई
तपासणी मोहिमेदरम्यान एकूण ६६ वाहनांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायदा व संबंधित नियमांनुसार कारवाई करण्यात आली.
कारवाईचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे :
- लायसन नोट कॅरी – ०२
- पीयूसी – ०१
- चालक युनिफॉर्म – ०६
- अतिरिक्त प्रवासी – ०६
- फायर बॉटल – ०६
- प्रथमोपचार पेटी – ०५
- फिटनेस – ०२
- इमर्जन्सी एक्झिट सुस्थितीत नसणे – ०३
- सेफ्टी काचा व जाळीबाबत – ०२
या विविध नियमभंगांप्रकरणी एकूण ३३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पुढेही कारवाईचा इशारा
शहरामध्ये प्रथमच अशा प्रकारची विशेष ड्राइव्ह राबविण्यात आल्याने काही वाहनचालकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत समज देऊन सोडण्यात आले. मात्र, यापुढे अधिक सक्त पणे सदरची तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक ही केवळ वाहनचालकाची नव्हे तर स्कूल बस चालक, वाहनमालक, शाळा प्रशासन आणि पालकांचीही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भातील सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन श्रीरामपूर पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.













