
श्रीरामपूर हादरले! हॉटेल लक्ष्मीनारायणचे चालक-मालक आकाश दुबैय्या यांची निर्घृण हत्या
श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड परिसरात शनिवारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेत हॉटेल लक्ष्मीनारायणचे चालक-मालक आकाश शेखर दुबैय्या (वेंकटरामन) यांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संशयित सुरज जाधव व त्याच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये येत आकाश दुबैय्या यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या दुबैय्या यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून श्रीरामपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित जाधव हा नेवासा रोडवरील बसस्थानकासमोर फास्टफुड ची गाडी चालवत असून त्याचा
गुन्हेगार क्षेत्रातील लोकांशी सबथ आहे अशी माहिती समोर येत आहे. मात्र, या माहितीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
घटनेनंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणाचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत असून हत्येचे नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि गुन्ह्यामागील पार्श्वभूमी तपासातून स्पष्ट होणार आहे.
टीप: या वृत्तातील काही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून पोलिसांच्या अधिकृत तपासानंतर त्यामध्ये बदल होऊ शकतो.













