Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

श्रीरामपूर विभागात पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन;

श्रीरामपूर विभागात पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन; १२ फरार आरोपी जेरबंद, ४० दारूबंदी व १८ जुगाराचे गुन्हे दाखल. भंगार दुकानांवरही कारवाई.

श्रीरामपूर विभागात पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन; १२ फरार आरोपी जेरबंद, ४० दारूबंदी व १८ जुगाराचे गुन्हे दाखल

भंगार दुकानांवर धाडी; संशयित वाहने व वाहनांचे मोठ्या प्रमाणात सुटे भाग जप्त, ३२२ मोटार वाहन कारवायांतून २ लाख ५ हजार ५०० रुपयांचा दंड

शिव वार्ता प्रतिनिधी ! बापूसाहेब नवले

श्रीरामपूर विभागात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच फरार व पाहिजे आरोपी, अवैध धंदे, बेकायदेशीर शस्त्रे, अवैध दारू, जुगार-मटका आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी व्यापक ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबविले. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे ,यांच्या श्रीरामपूर कार्यालय, प्रेस नोटनुसार, या विशेष मोहिमेत विभागातील १७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध स्वरूपाच्या कारवाया करण्यात आल्या.

या कारवाईत अनेक वर्षांपासून फरार व नजरेआड असलेल्या १२ आरोपींना जेरबंद करण्यात आले. याशिवाय अजामीनपात्र वॉरंटमधील १०० आरोपींविरुद्ध वॉरंटची बजावणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले, तर जामीनपात्र वॉरंटमधील १४६ आरोपींना वॉरंट बजावून न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. न्यायालयीन कामकाजाशी संबंधित ३३८ समन्सचीही बजावणी करण्यात आली.

भंगार दुकानांवर पोलिसांची करडी नजर

श्रीरामपूर शहर व परिसरात दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची आणि वाहनांच्या पार्ट्सची चोरी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर चोरीची वाहने विविध भंगार दुकानांमध्ये बेकायदेशीररीत्या विकली जात असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार शहरातील काही भंगार दुकाने, टायर्स दुकाने व गॅरेजची पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली.

यारा टायर्स, सुतगिरणी फाटा येथे केलेल्या तपासणीत विविध वाहनांचे संशयित भाग आणि वाहने आढळून आली. त्यामध्ये इंडिगो, ओमिनी, सॅन्ट्रो, टाटा व्हिस्टा, टाटा मॅजिक, टाटा मेगा, लोगान, मॅजिक, स्टीम, टाटा झिप, इंडिगो, शेव्ह्रोले आणि टाटा एस आदी वाहनांचा समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याशिवाय चारचाकी वाहनांचे पांढऱ्या रंगाचे २६ दरवाजे, ग्रे रंगाचे ४ दरवाजे आणि २८ टायर्स आढळून आले.

डी.एम. टायर्स अँड गॅरेज, रेल्वे फाटकाजवळ, सुतगिरणी फाटा येथेही तपासणी करण्यात आली. येथे तीन ट्रॅक्टर, चारचाकी वाहनांची २५ इंजिने, ५० गिअर बॉक्स, १६० दरवाजे, ५० टायर्स, ८० लाईट, ३० रेडिएटर, तसेच इतर वाहनांचे सुटे भाग आढळून आल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.

दुसऱ्या भंगार दुकानात १५ संशयित वाहने

अनिस हारून शहा यांच्या दुकानाची तपासणी केली असता मारुती स्विफ्ट, लॉरा, इंडिका, टाटा मांझा यांसह एका चारचाकी वाहनाची बॉडी आणि इतर संशयित वस्तू आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

तसेच सुलेमान दादामियाँ शहा, शकिल इब्राहिम शहा आणि आसिफ हारून शहा यांच्या संजयनगर येथील दुकानात वॅगनर, मारुती आल्टो, ओमिनी, स्विफ्ट, टाटा सुमो, टाटा मॅजिक, सॅन्ट्रो, टाटा इंडिका, पोलो, आय-२०, टाटा व्हिस्टा, टाटा एस आदींसह एकूण १५ संशयित वाहने आढळून आली.

या वाहनांबाबत मालकी हक्क व कागदपत्रांची विचारणा केली असता समाधानकारक स्पष्टीकरण अथवा कागदपत्रे सादर करता आली नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे संबंधित भंगार दुकान मालक/चालकांविरुद्ध चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणांचा पुढील तपास न्यायालयाच्या परवानगीने करण्यात येणार असून, संबंधित वाहने कोठून खरेदी केली, कोणाकडून मिळाली आणि त्यांची कागदपत्रे कोणाकडे आहेत, याचा तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

श्रीरामपूर विभागात पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन; १२ फरार आरोपी जेरबंद, ४० दारूबंदी व १८ जुगाराचे गुन्हे दाखल. भंगार दुकानांवरही कारवाई.

दोन ठिकाणी तलवारी जप्त

ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान अवैध शस्त्रांविरुद्धही कारवाई करण्यात आली.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कपील राजू पिंपळे (वय २८, रा. सुरेगाव, ता. कोपरगाव) याच्याकडून धारदार लोखंडी तलवार आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यश विठ्ठल जगधने (वय २६, रा. कॉलेज रोड, मुंजोबानगर, राहुरी) याच्याकडूनही धारदार लोखंडी तलवार आढळून आल्याने शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

४ किलो गांजा व कार असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जर्मन हॉस्पिटलच्या पाठीमागील उपाध्ये मळा, वॉर्ड क्रमांक १ येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत मयूर राजेंद्र वाघ, रा. नेवासा व त्याचे दोन साथीदार यांच्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने ठेवलेला असल्याचा संशय असलेला ४ किलो वजनाचा गांजा आढळून आला.

या कारवाईत एक किया सोनेट कार देखील जप्त करण्यात आली असून, गांजा व वाहनासह एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये नमूद आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध दारूविक्रीवर ४० गुन्हे

श्रीरामपूर विभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैधरित्या दारूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. या कारवाईत दारूबंदी कायद्यान्वये ४० गुन्हे दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्याचबरोबर पैसे लावून मटका व जुगार खेळणाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, जुगार-मटका प्रकरणी एकूण १८ गुन्हे दाखल करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला.

१२ फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अनेक वर्षांपासून फरार, परागंदा किंवा पोलिसांच्या नजरेआड असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके सक्रिय करण्यात आली होती. या मोहिमेत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील ३, राहुरी हद्दीतील २, तर श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका, नेवासा, कोपरगाव शहर, शिर्डी, लोणी आणि अकोले पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येकी एक अशा एकूण १२ आरोपींना जेरबंद करण्यात आल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.

१०० अजामीनपात्र वॉरंटची बजावणी

न्यायालयात हजर न राहिलेल्या आरोपींविरुद्धही पोलिसांनी प्रभावी कारवाई केली. अजामीनपात्र वॉरंटमधील १०० आरोपींविरुद्ध वॉरंटची बजावणी करून त्यांना अटक करत न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

यापूर्वी संबंधित आरोपींना समन्स तसेच जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते; मात्र ते न्यायालयात हजर झाले नसल्याने पुढील कारवाई म्हणून अटक वॉरंट बजावण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

तसेच १४६ जामीनपात्र वॉरंटची बजावणी करून संबंधित आरोपींना न्यायालयात हजर राहण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या.

३३८ समन्सची बजावणी

न्यायालयात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांमध्ये ३३८ समन्स निर्धारित वेळेत बजावण्यात आले. संबंधित व्यक्तींना न्यायालयाने दिलेल्या तारखेला हजर ठेवण्याच्या प्रक्रियेमुळे न्यायालयीन कामकाज सुरळीत होण्यास मदत झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

वाहतूक नियम मोडणाऱ्यांवरही कारवाई

ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान रस्त्यावर बेशिस्त वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, वाहनांवरील ब्लॅक फिल्म, सीट बेल्टचा वापर न करणे आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत ३२२ मोटार वाहन कायद्याच्या केसेस करण्यात आल्या असून, त्यातून २ लाख ५ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध ३ ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ प्रकरणे दाखल करण्यात आली.

कॅफे व कॅन्टीनचीही तपासणी

श्रीरामपूर शहरात अल्पवयीन मुलींचे अपहरण व विनयभंगासारख्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील काही कॅफे व कॅन्टीनचीही बारकाईने तपासणी केली.

नेवासा रोड, वॉर्ड क्रमांक ६ येथील ‘स्नॅप कॅफे’ येथे तरुण मुला-मुलींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली. या कारवाईदरम्यान कॅफेसमोर सार्वजनिक शांतता भंग करताना एक व्यक्ती आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

१७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष मोहीम

श्रीरामपूर विभागातील या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका, राहुरी, नेवासा, सोनई, शिंगणापूर, संगमनेर शहर, संगमनेर तालुका, अकोले, राजूर, घारगाव, आश्वी, कोपरगाव शहर, कोपरगाव तालुका, शिर्डी, राहाता आणि लोणी आदी १७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध स्वरूपाच्या कारवाया करण्यात आल्याचे संबंधित कागदपत्रांमध्ये नमूद आहे.

पोलिसांच्या कारवाईकडे पुढील तपासाचे लक्ष

भंगार दुकानांमध्ये आढळलेल्या संशयित वाहनांबाबत त्यांची मूळ कागदपत्रे, वाहनांची खरेदी-विक्रीची साखळी आणि संबंधित वाहने चोरीची आहेत का, याचा पुढील तपास होणार आहे. त्यामुळे या कारवाईतून वाहन चोरीच्या घटनांशी संबंधित आणखी काही धागेदोरे समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.

ही संपूर्ण कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे , तसेच संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे

टीप : वरील वृत्तातील आरोपी, संशयित वाहने, जप्त मुद्देमाल आणि गुन्ह्यांबाबतची माहिती संबंधित पोलीस विभागाच्या प्रेस नोटवर आधारित आहे. प्रकरणांतील दोष सिद्ध होणे हा न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आहे.

 

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!