Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

श्रीरामपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू तस्करीवर धडाकेबाज कारवाई

श्रीरामपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू तस्करीवर धडाकेबाज कारवाई

१४ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; प्रशिक्षणार्थी डीवायएसपी कल्पना पवार यांची पदभार स्वीकारताच पहिलीच मोठी कारवाई

श्रीरामपूर | शिव वार्ता प्रतिनिधी बापूसाहेब नवले

श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोदावरी नदीपात्रातून तसेच शिवारातून अनधिकृतपणे वाळू उपसा करून तिचा साठा व चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात श्रीरामपूर तालुका पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. भामाठाण शिवारातील गोदावरी नदीपात्र व जुन्या गावठाण परिसरात तब्बल १६५ ब्रास अवैध वाळूचा साठा आढळून आला. तसेच भामाठाण ते माळवाडगाव मार्गावर रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी रंगेहाथ पकडला.

या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १४ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचा पदभार नुकताच स्वीकारलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्रीमती कल्पना अंबादास पवार यांनी पदभार स्वीकारताच अवैध वाळू वाहतूक व साठवणुकीविरोधात केलेली ही पहिलीच मोठी कारवाई ठरली आहे.

१६५ ब्रास वाळूचा साठा जप्त

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस व महसूल विभागाने संयुक्तपणे भामाठाण शिवारातील गोदावरी नदीपात्र तसेच जुन्या गावठाण परिसरात कारवाई केली. या ठिकाणी बेवारस व अनोळखी व्यक्तींच्या नावावर ठेवण्यात आलेला १६५ ब्रास वाळूचा साठा आढळून आला. या वाळूची अंदाजे किंमत ९ लाख ९० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

वाळू वाहतूक करणारा टेम्पो रंगेहाथ

दुसऱ्या कारवाईत भामाठाण ते माळवाडगाव जाणाऱ्या मार्गावर रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. या कारवाईत टेम्पोसह वाळू असा एकूण ५ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन्ही कारवायांमध्ये मिळून १४ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.

विविध कायद्यांनुसार कारवाई

या प्रकरणी संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पर्यावरण संरक्षण अधिनियम, खनिकर्म अधिनियम तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील संबंधित तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू उपसा, साठवणूक आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी घेतलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आगामी काळातही अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!