रंगरंगुल्या, सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला..!
हिरवी नाजुक रेशिम पाती, दोन बाजूंनी सळसळती…
नीळ नीळुली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती…

रत्नागिरीच्या सड्यांवर खुलला रानफुलांचा रंगोत्सव; दुर्मिळ वनस्पतींनी नटला निसर्ग
पर्यटन | पर्यावरण | विशेष लेख
पावसाच्या सरींनी चिंब भिजलेल्या रत्नागिरीच्या तांबड्या सड्यांवर सध्या रंगीबेरंगी रानफुलांचा अद्भुत गालिचा अंथरला आहे. साडवली, जैतापूर, देवाचे गोठणे आणि नाटेसह २० हून अधिक सड्यांवर फुललेल्या दुर्मिळ वनस्पती निसर्गप्रेमी आणि पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
कवयित्री इंदिरा संत यांच्या या ओळी वाचताना डोळ्यांसमोर उभा राहणारा निसर्गाचा मनोहारी कॅनव्हास सध्या प्रत्यक्षात रत्नागिरी जिल्ह्यातील सड्यांवर अनुभवायला मिळत आहे. पावसाच्या सरींनी चिंब भिजलेल्या तांबड्या मातीच्या सड्यांनी हिरवागार शालू परिधान केला असून, त्यावर विविध रंगांच्या रानफुलांची जणू निसर्गाने अप्रतिम वेलबुट्टीच रेखाटली आहे.
आजवर साताऱ्यातील कास पठार आणि कोल्हापूरच्या मसाई पठाराने आपल्या रानफुलांच्या अद्वितीय सौंदर्याने पर्यटकांना भुरळ घातली. मात्र आता रत्नागिरी जिल्ह्यातील साडवली, जैतापूर, देवाचे गोठणे, नाटे यांसह २० ते २२ हून अधिक सड्यांनीही निसर्गप्रेमींना प्रेमळ साद घातली आहे. या सड्यांवर सध्या रंगीबेरंगी रानफुलांची उधळण पाहायला मिळत असून, पर्यटकांसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरत आहे. शिव वार्ता विशेष “चार हातांचा विठ्ठल…
दीपकाडी, कंदीलपुष्प, कुमुदिनी, रानहळद, विविध प्रकारच्या अमरी, चोहळा, परजीवी वनस्पतींचे आकर्षक तुरे, केना अशा अनेक दुर्मिळ वनस्पती आणि रानफुलांनी संपूर्ण परिसर बहरून गेला आहे. काही फुले फक्त काही आठवड्यांसाठी उमलतात आणि पुन्हा वर्षभर सुप्तावस्थेत जातात. त्यामुळे त्यांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे सांगतात की, साडवलीच्या सड्यावर एकदांडी (Dipcadi concanense) ही कंदवर्गीय वनस्पती मोठ्या प्रमाणात फुलली आहे. या प्रजातीचा देवरुखेन्स हा नवीन वाणही संशोधकांसमोर आला आहे. या वनस्पती पावसाळ्यातील केवळ एक-दोन महिने फुलतात आणि नंतर पुन्हा जमिनीत सुप्तावस्थेत जातात.
ओहोळांच्या काठावर फुलणारा चोहळा (Curcuma scaposa) हा आलेवर्गीय वनस्पतींचा दुर्मिळ प्रकार सध्या लक्ष वेधून घेत आहे. औषधी गुणधर्म असलेली ही वनस्पती आता धोकाग्रस्त प्रजातींमध्ये गणली जाते. तिचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे
जैतापूर, नाटे आणि धाऊलवल्ली परिसरातील सड्यांवर फुललेले गुलाबी कापरी कमळ (Cleome angulata) पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. डॉ. अरुण चांदोरे आणि डॉ. श्रीरंग यादव यांनी शोधून काढलेल्या या वनस्पतीला ‘पाणतिळवण’ असेही म्हटले जाते. वार्यावर डोलणारी तिची गुलाबी फुले पाहताना जणू संपूर्ण सडा गुलाबी रंगाच्या गालिच्याने व्यापला असल्याचा भास होतो.
वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रताप नाइकवडे यांच्या मते, साडवली आणि आंबोली परिसरात Iphigenia devrukhensis म्हणजेच ‘गुलाबी भुईचक्र’ ही दुर्मिळ वनस्पती आढळते. दीपकाडीच्या आधी फुलणारी ही फुले सड्यावर गुलाबी चादर अंथरल्याचा भास निर्माण करतात. या वनस्पतीला आता स्वतंत्र वैज्ञानिक ओळखही प्राप्त झाली आहे.
या नैसर्गिक संपदेचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’तर्फे गेली अनेक वर्षे ‘फुलोत्सव’ आयोजित केला जात आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सड्यांचे पर्यावरणीय महत्त्व, दुर्मिळ वनस्पतींची ओळख आणि त्यांच्या संवर्धनाची गरज याविषयी मार्गदर्शन केले जाते.
रत्नागिरीच्या सड्यांवर खुललेला हा रानफुलांचा रंगोत्सव केवळ डोळ्यांना आनंद देणारा नाही, तर जैवविविधतेचा अमूल्य ठेवा आहे. या सौंदर्याचा आस्वाद घेताना त्याचे जतन करणे ही प्रत्येक निसर्गप्रेमीची जबाबदारी आहे. फुले तोडण्याऐवजी, त्यांना न दुखवता त्यांचे सौंदर्य अनुभवणे आणि पुढील पिढ्यांसाठी हा वारसा जपणे, हीच खरी निसर्गपूजा ठरेल.
निसर्गाच्या या रंगोत्सवात हरवताना कवयित्री इंदिरा संत यांच्या ओळी पुन्हा एकदा मनात घुमू लागतात—.
मलाही वाटे लहान होऊन, तुझ्याहूनही लहान रे…
तुझ्या संगे सडा रहावे, विसरून शाळा, घर सारे…
रत्नागिरीच्या सड्यांवरील हा रंगोत्सव प्रत्येक निसर्गप्रेमीने आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवावा, अशीच त्याची मोहिनी आहे.
🌺 लेखातील प्रमुख विभाग
🌱 रत्नागिरी सडे ठरत आहेत नवे आकर्षण
🌼 दुर्मिळ रानफुलांनी सजला निसर्ग
🔬 संशोधकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या वनस्पती
🌍 संवर्धनाची गरज आणि फुलोत्सव
प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी
9403464101














