सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगावात अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; जेसीबीसह डंपर जप्त
मायगाव देवी परिसरात पोलिसांचा छापा; दोन इसमांवर गुन्हा दाखल, ६ ब्रास वाळूसह तब्बल २० लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
शिव वार्ता | प्रतिनिधी :
कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने मोठी कारवाई केली. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत जेसीबीच्या साहाय्याने डंपरमध्ये वाळू भरताना दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी एक जेसीबी, एक डंपर आणि सहा ब्रास वाळू असा एकूण २० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मायगाव देवी गावच्या शिवारात मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत अवैधरीत्या वाळूचा साठा करून त्याची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन पथकाने पंचांसमक्ष कारवाईची तयारी केली.
जेसीबीच्या साहाय्याने डंपरमध्ये वाळू भरताना कारवाई
पोलिसांचे पथक मायगाव देवी परिसरात पोहोचले असता मोकळ्या जागेत वाळूचा साठा आढळून आला. त्याच ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने डंपरमध्ये वाळू भरली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पथकाने तातडीने कारवाई करत जेसीबी व डंपरच्या चालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे वाळू वाहतूक करण्याचा वैध परवाना आहे का, याबाबत चौकशी केली असता कोणताही वैध परवाना नसल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संबंधित वाळू गोदावरी नदीपात्रातून आणून या ठिकाणी साठवण्यात आल्याचे समोर आले.
दोन इसम ताब्यात
या कारवाईत जेसीबी चालक किशोर देवीदास धोत्रे (वय २६, रा. मायगाव देवी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एमएच १७ डीजे ४५८० क्रमांकाची जेसीबी जप्त करण्यात आली.
तर डंपर चालक सुरेश सुकदेव सोनवणे (वय ३८, रा. शिंगणापूर, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एमएच १२ एसएक्स २३१३ क्रमांकाचा डंपर जप्त करण्यात आला.
सहा ब्रास वाळूसह २० लाख ३० हजारांचा मुद्देमाल
पोलिसांनी केलेल्या कारवाईत पिवळ्या रंगाची ३DX प्लस मॉडेलची जेसीबी, टाटा कंपनीचा ९०९ एचडी टिप्पर/डंपर आणि अंदाजे सहा ब्रास वाळू असा एकूण २० लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात झालेल्या या कारवाईमुळे कोपरगाव तालुक्यातील वाळू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ मधील कलम ३ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील वाचक पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार सचिन धनाड, अनिल शेंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय भोसले तसेच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे यांनी सहभाग घेतला.श्रीरामपूरमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; लाखांचा मुद्देमाल जप्त













