
NHM मधील १० वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची जिल्हानिहाय यादी तयार करण्याचे आदेश
मुबई | प्रतिनिधी :राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक अखंड सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांची जिल्हानिहाय वरिष्ठता यादी तातडीने तयार करण्याचे निर्देश आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी दिले आहेत.
या संदर्भात सर्व उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळांना पत्र पाठविण्यात आले असून शासनाच्या ३० जून २०२६ च्या निर्णयानुसार पात्र कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यास सांगण्यात आले आहे.
पत्रानुसार, २५ जून २०२६ रोजी १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक अखंड कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात येणार आहे. वरिष्ठता निश्चित करताना प्रथम नियुक्तीची तारीख, अखंड सेवा कालावधी, पदनिहाय वर्गीकरण तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता यांचा आधार घेतला जाणार आहे.
शासनाच्या निर्णयानुसार पात्र कर्मचाऱ्यांना समकक्ष वेतनश्रेणीतील नियमित पदांवर नियुक्ती देण्याच्या प्रक्रियेसाठी ही यादी महत्त्वाची ठरणार असून, सर्व जिल्ह्यांकडून माहिती तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ही प्रक्रिया पारदर्शक व समान निकषांवर आधारित राहावी, यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना देखील संबंधित कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.













