शालेय परिसरात बिबट्याचा मुक्त संचार;विद्यार्थ्यांमध्ये घबराट
खंडोबा वस्तीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन; वन विभागाकडून तातडीने उपाययोजनांची मागणी
टाकळीभान | शिव वार्ता प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील खंडोबा वस्ती परिसरात बिबट्याचा वारंवार मुक्त संचार होत असल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या परिसरातच बिबट्याच्या हालचाली होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
खंडोबा वस्ती परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती, झाडी-झुडपे आणि विविध प्रकारची शेती पिके असल्याने वन्यप्राण्यांना लपण्यासाठी आणि निवाऱ्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध आहे. यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता वाढली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविताना पालक विशेष खबरदारी घेत असून, शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकट्याने शेतरस्त्याने जाऊ नये, याबाबतही काळजी घेतली जात आहे.
शालेय व्यवस्थापनाच्या वतीनेही विद्यार्थी व पालकांना वन्यप्राण्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, त्याला चिथावणे किंवा गर्दी करणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, एखादी अनुचित किंवा दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी वन विभागाने तातडीने खंडोबा वस्ती परिसराची पाहणी करावी. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन वन विभागाने तातडीने दखल घ्यावी आणि परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.













