Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

कर्मवीर भाऊराव पाटील १३९ वी जयंती टाकळीभान विद्यालय

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त टाकळीभान विद्यालयात उत्साहात सोहळा

गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ; माजी विद्यार्थी, देणगीदार व शिक्षणप्रेमींची मोठी उपस्थिती

टाकळीभान | शिव वार्ता प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, टाकळीभान येथे जयंती सोहळा, विविध स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि विविध उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाकळीभान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन मंजाबापू धोंडीबा थोरात होते. प्रमुख वक्ते म्हणून ‘वारकरी दर्पण’चे संपादक ह.भ.प. सचिन दिलीपराव आहेर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगडचे माजी प्राचार्य मधुकर अंबादास दाभाडे, पुणे येथील उद्योजक व विद्यालयाचे माजी विद्यार्थी विजयराव सोपानराव घुले, तसेच आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त स्वाती तानाजी पटारे उपस्थित होत्या.

यावेळी रयत शिक्षण संस्था, सातारा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत गजानन भालेराव, रयत शिक्षण संस्था सातारा जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब बाळाजी पटारे, स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य तथा टाकळीभान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन राहुल आप्पासाहेब पटारे, शिवव्याख्याते व व्यापारी नवाजभाई शेख, अहिल्यादेवी वसतिगृहाचे अधीक्षक सुरेश गलांडे, माजी प्राचार्य जयकर मगर, शिवाजीराव धुमाळ, ज्येष्ठ कवी पोपटराव पटारे, माजी रयत सेवक कार्लस साठे, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष अनिल दाभाडे, रावसाहेब लहू रणनवरे, सौ. रत्नमाला देविदास रणनवरे यांच्यासह शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, पत्रकार बंधू-भगिनी व मोठा मित्रपरिवार उपस्थित होता.

कर्मवीर पुतळ्याचे पूजन; झांज पथकाने वेधले लक्ष

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य शिंदे आर. एम., पर्यवेक्षक जरे एस. एस. सर तसेच स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य व सल्लागार समिती सदस्य यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राठोड एस. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट झांज पथकाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

त्यानंतर शक्तीस्थळाजवळील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आणि अण्णासाहेब पटारे यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी व्यक्त केले मनोगत

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पाचपिंड एम. ए. व श्रीमती पांढरे डी. ए. यांनी केले. विद्यालयाच्या ज्येष्ठ सेविका पालवे मॅडम यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाच्या गुणवत्तेच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच विद्यालयाला वेळोवेळी मदत करणाऱ्या विविध देणगीदारांचे आभार मानले.

विद्यालयातील श्री. पाचपिंड ए. ए. सर यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थी मनोगतामध्ये इयत्ता दहावीची विद्यार्थिनी सुप्रिया प्रसाद कदम आणि इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी शिवन्या रवींद्र बनकर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्यावर प्रभावी मनोगत व्यक्त केले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सप्ताहानिमित्त विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.

माध्यमिक विभागातील पारितोषिक वितरणाचे वाचन श्रीमती पालवे एन. ए., श्रीमती नलवडे एस. बी., श्री. कोकाटे एस. पी. आणि श्री. देवरे बी. व्ही. यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयातील पारितोषिक वितरणाचे वाचन प्रा. जाधव एस. यू. व श्री. पाचपिंड ए. ए. यांनी केले.

‘कर्मवीर म्हणजे कलियुगातील भगीरथ’ – सचिन आहेर

प्रमुख वक्ते ह.भ.प. सचिन आहेर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्याचा विविध पैलूंनी परिचय करून दिला. कर्मवीर अण्णांच्या ‘देसाई’ ते ‘पाटील’ आडनावापर्यंतचा इतिहास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.

अज्ञान आणि अशिक्षितपणाच्या काळात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यांत पोहोचविणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे ‘कलियुगातील भगीरथ’ असल्याचे त्यांनी सांगितले. कर्मवीरांना पद्मभूषण आणि ‘कर्मवीर’ या पदव्या स्वकर्तृत्वावर व कोणत्याही वशिल्याशिवाय कशा प्राप्त झाल्या, याची माहिती देत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेतल्यास जीवनात निश्चित यश मिळू शकते, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

सत्याची साथ सोडू नका – मधुकर दाभाडे

प्रमुख अतिथी माजी प्राचार्य मधुकर दाभाडे यांनी कर्मवीर अण्णांच्या जीवनातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडले. डांबर प्रकरणासह विविध प्रसंगांत कर्मवीरांनी सत्याची बाजू घेताना कोणत्याही दबावापुढे न झुकता आपली भूमिका कायम ठेवली, असे त्यांनी सांगितले.

जातिभेदाच्या विरोधातील कर्मवीर अण्णांचा करारी स्वभाव आणि समाजातील वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे त्यांचे कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून ज्ञान व संस्कार घेऊन आदर्श जीवन जगावे, असे आवाहन दाभाडे यांनी केले.

‘दृढ इच्छाशक्ती व मेहनतीने यश निश्चित’ – विजयराव घुले

विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा पुणे येथील उद्योजक विजयराव सोपानराव घुले यांनी आपल्या जीवनप्रवासाविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अत्यंत खडतर परिस्थितीतून वाटचाल करत पुणे येथे उद्योजक म्हणून उभे राहण्याचा अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.

दृढ इच्छाशक्ती, कठोर मेहनत आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर कोणत्याही परिस्थितीत यश संपादन करता येते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

टाकळीभान न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळा
टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी सत्य व आदर्श जीवन जगावे – मंजाबापू थोरात

कार्यक्रमाचे अध्यक्ष मंजाबापू धोंडीबा थोरात यांनी कर्मवीर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मेहनत आणि सातत्य ठेवले तर प्रत्येक विद्यार्थ्याला यशस्वी होता येते. आपल्या जीवनात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखा आदर्श असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सत्याची कास धरून चांगले व आदर्श जीवन जगावे, असा संदेशही त्यांनी दिला.

माजी सेवकाच्या सुपुत्राकडून विद्यार्थ्यांना अन्नदान

विद्यालयाचे माजी सेवक स्वर्गीय एस. बी. चव्हाण यांचे सुपुत्र अविनाश शामराव चव्हाण, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, कोयना धरण यांनी विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली. तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी व थोर देणगीदार देविदास लहू रणनवरे यांनीही कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजन देऊन अन्नदान केले.

माजी विद्यार्थी, देणगीदार आणि ग्रामस्थांकडून विद्यालयाला मिळणारे सहकार्य ही रयत शिक्षण संस्थेच्या संस्कारांचीच परंपरा असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सौ. पाचपिंड एम. ए. यांनी आभार प्रदर्शन केले. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी, देणगीदार व मान्यवरांमुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली.अस्लम इनामदारचे सलग दुसरे आशियाई सुवर्णपदक

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!