२० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात अस्लम इनामदारची निवड
शिव वार्ता प्रतिनिधी : दिलीप लोखंडे
अहिल्यानगरच्या कबड्डीपटूंनी राज्यासह देशपातळीवर निर्माण केलेला दबदबा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. जपान येथे होणाऱ्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी भारतीय पुरुष कबड्डी संघाची घोषणा करण्यात आली असून, कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथील अस्लम इनामदार याची भारतीय संघात निवड झाली आहे. त्याच्या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, जिल्ह्यासाठी हा सुवर्णमय क्षण ठरला आहे.
गतविजेता म्हणून स्पर्धेत उतरणाऱ्या भारतीय संघात १२ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अस्लम इनामदारसह आशु मलिक, अयान लोहचब, देवांक दलाल, अर्जुन देशवाल, सुनील कुमार, जयदीप दहिया, राहुल सेथपाल, गौरव खत्री, सुमित सांगवान, अंकित जगलान आणि पवन सेहरावत यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्रातून भारतीय संघात निवड झालेला अस्लम हा एकमेव खेळाडू आहे. यापूर्वी २०२३ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही अस्लमने भारतीय कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
अस्लमने खेलो इंडिया स्पर्धा, राज्य अजिंक्यपद स्पर्धा, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा तसेच प्रो कबड्डी लीगमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मानाच्या शिवछत्रपती पुरस्कारानेही त्याला सन्मानित करण्यात आले आहे.
अस्लमच्या या निवडीचे जिल्हाभरातून कौतुक होत असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने दमदार कामगिरी करावी, यासाठी क्रीडाप्रेमींसह नागरिकांकडून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
शिवम, आदित्य व अजित यांना पुढील स्पर्धेची प्रतीक्षा
भारतीय संघाची जर्सी परिधान करण्याचे स्वप्न फार कमी खेळाडूंचे साकार होते. गेल्या वर्षभरापासून भारतीय संघातील निवडीसाठी राष्ट्रीय सराव शिबिरात मेहनत घेणारे अहिल्यानगरचे कबड्डीपटू शिवम पटारे, आदित्य शिंदे आणि अजित पवार यांची यावेळी भारतीय संघात निवड झालेली नाही. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंना भारतीय संघाची जर्सी परिधान करण्यासाठी पुढील स्पर्धेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.













