श्रीरामपूरमध्ये अमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थी देणार व्यसनमुक्तीचा संदेश
निबंध, चित्रकला, वक्तृत्व व रांगोळी स्पर्धांतून जनजागृती; २१ ऑगस्टला आर.बी.एन.बी. महाविद्यालयाच्या मैदानातून भव्य रॅली
शिव वार्ता प्रतिनिधी ! बापूसाहेब नवले
अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून तरुण पिढीला दूर ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने अमली पदार्थविरोधी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला श्रीरामपूर शहर व परिसरातील शाळा-महाविद्यालयांचा तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अभियानाच्या माध्यमातून दि. १८, १९ आणि २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध शैक्षणिक व कलात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध, चित्रकला, वक्तृत्व आणि रांगोळी अशा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवनशैली, कुटुंबाची भूमिका आणि सामाजिक जबाबदारी याबाबत आपले विचार मांडण्याची संधी मिळत आहे.
अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली आणि डी.वाय.एस.पी. श्री. नयन भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. श्रीरामपूर येथील चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स येथे अभियानांतर्गत निबंध स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. रतन शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. मीनाताई जगनने यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विशाल खैरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन;
‘नशामुक्त भारत’साठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा
अध्यक्षस्थानावरून बोलताना मीनाताई जगनने यांनी नशामुक्त भारत घडविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. नशामुक्त भारताच्या संकल्पनेसाठी अशा प्रकारच्या निबंध स्पर्धा अत्यंत उपयुक्त असून, विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या समस्येचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश कुटुंब, मित्रपरिवार आणि समाजातील विविध घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकतो. त्यामुळे युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
पोलीस निरीक्षक श्री. विशाल खैरे यांनी आपल्या मनोगतात नशामुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून पोलीस विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तरुणाईला सकारात्मक दिशा देण्यासाठी आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांनी प्रास्ताविकातून रत्न शिक्षण संकुलाच्या वतीने निबंध स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांचे स्वागत केले. नशामुक्त भारत अभियानासाठी प्रत्येक भारतीयाने कटिबद्ध राहण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.
विविध विषयांवर विद्यार्थ्यांची लेखणी
इयत्ता ९ वी ते १२ वी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘व्यसनमुक्त कुटुंब, सुखी कुटुंब’, ‘व्यसनमुक्त भारत, निरोगी भारत’, ‘नशामुक्त समाज’, ‘काळाची गरज’ आणि ‘नशामुक्त शाळा, सुरक्षित विद्यार्थी’ या विषयांवर निबंध लेखन घेण्यात आले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘व्यसनास नकार, जीवनास होकार’, ‘व्यसनाचे दुष्परिणाम आणि उपाययोजना’, ‘व्यसनमुक्ती समाजाची सामूहिक जबाबदारी’, ‘व्यसनमुक्त भारतासाठी माझे योगदान’ आणि ‘व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीची गरज’ या विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेचे संयोजन डॉ. डी. बी. कराळे यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील साळवे यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
चित्रकला, वक्तृत्व आणि रांगोळीतूनही व्यसनमुक्तीचा संदेश
अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी विविध कलात्मक आणि बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी डी.डी. कानडे विद्यालय, श्रीरामपूर येथे चित्रकला स्पर्धा, तर दि. २० ऑगस्ट रोजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर एस. के. सोमय्या शाळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
या स्पर्धांमधून विद्यार्थी अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवन, सुरक्षित विद्यार्थी, कुटुंबाची भूमिका आणि समाजाची सामूहिक जबाबदारी यांसारख्या विषयांवर आपली सर्जनशीलता आणि विचार मांडणार आहेत.
अभियानाच्या आयोजनासाठी श्री. दीपक धिमुण, गटशिक्षणाधिकारी श्रीरामपूर, श्रीमती शितल मुगडे, पोलीस निरीक्षक श्री. रोशन निकम, पोलीस उपनिरीक्षक एस. के. सोमय्या, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सानाली पेंढणे, उपप्राचार्य डॉ. अनिकेत खबी, विभागप्रमुख प्रा. विजय नागपुरे व प्रा. योगीराज चंद्रात्रे यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पोंभिमा गुजर यांनी केले, तर प्रा. डॉ. संतोष धांगळे यांनी आभार मानले.
२१ ऑगस्टला श्रीरामपुरात जनजागृती रॅली
अभियानाचा प्रमुख टप्पा म्हणून दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता आर.बी.एन.बी. कॉलेज मैदान, श्रीरामपूर येथून अमली पदार्थविरोधी जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.
या रॅलीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे. अमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती करणाऱ्या या रॅलीत शाळा, विद्यालये, महाविद्यालये आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
अमली पदार्थांचे सेवन हा केवळ एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित प्रश्न नसून त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजावर होत असतात. व्यसनामुळे आरोग्य, शिक्षण, रोजगार, कौटुंबिक स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन, शैक्षणिक संस्था, पालक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.
श्रीरामपूरमध्ये सुरू असलेल्या या अभियानातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळतानाच ‘व्यसनाला नकार आणि निरोगी जीवनाला होकार’ हा संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.













