टाकळीभान शिवारात बिबट्याची शेळीवर झडप; शेतकऱ्याने प्रसंगावधान राखत वाचविले प्राण
शिव वार्ता | प्रतिनिधी अशोक रणवरे
टाकळीभान शिवारात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास गट क्रमांक ४५१ परिसरात चारा चारत असलेल्या शेळीवर बिबट्याने अचानक झडप घालून तिला जखमी केले. शेतकरी नंदू दगडू रणनवरे यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याच्या तावडीतून शेळीची सुटका केली.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील शेतकरी नंदू रणनवरे यांची गट क्रमांक ४५१ मध्ये वस्ती असून, १६ चारीलगत ते आपल्या शेळ्या चारत होते. दुपारी सुमारे दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान अचानक बिबट्याने एका शेळीवर झडप घातली. बिबट्याने शेळीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, रणनवरे यांनी धाडस दाखवत बिबट्याच्या तावडीतून शेळीची सुटका केली. या हल्ल्यात शेळी जखमी झाली आहे.सड्यांवर खुलला रानफुलांचा रंगोत्सव
यापूर्वीही पाळीव प्राण्यांवर हल्ले
टाकळीभान परिसरातील शिवारात यापूर्वीही बिबट्याने शेळ्या, कुत्रे तसेच अन्य पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतावर जाण्यासह दिवसा देखील पाळीव जनावरे चारताना सतर्क राहावे लागत आहे.
बिबट्याचा वारंवार होत असलेला वावर आणि पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः शेतवस्तीच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी
बिबट्याच्या वाढत्या वावराची वन विभागाने तातडीने दखल घेऊन परिसराची पाहणी करावी. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, नागरिकांनी बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न न करता तातडीने वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.













