येवला लाचप्रकरणी श्रीरामपूर शहरच्या पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा
शिव वार्ता प्रतिनिधी : बापूसाहेब नवले
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असताना गुन्ह्यात आरोपी न करणे व अटक टाळून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याप्रकरणी, सध्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहीर यांच्यासह दोन खासगी व्यक्तींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.श्रीरामपूरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाला येवला तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी न करणे तसेच त्याला अटक होऊ न देण्यासाठी सुरुवातीला ₹4 लाखांची लाच मागण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या तडजोडीनंतर ही रक्कम ₹2.50 लाखांवर निश्चित करण्यात आल्याचा आरोप आहे.
चौकशीदरम्यान, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांच्या सांगण्यावरून त्यांच्यावतीने सुनील शिवाजी बोराडे (रा. पाटोदा, ता. येवला) याने 9 एप्रिल 2026 रोजी तक्रारदाराकडून ‘फोनपे’द्वारे लाचेच्या रकमेपैकी ₹50 हजार स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याचे ACB ने म्हटले आहे. तसेच उर्वरित रक्कम स्वीकारण्याची तयारीही दर्शविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहीर यांच्यासह दोन खासगी व्यक्तींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरणातील आरोपांची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आरोपींना दोषी ठरविण्यात आलेले नाही. पुढील तपासात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.












