Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

नाऊर-निमगाव खैरी रस्त्यासाठी २० लाखांचा निधी मंजूर

नाऊर-निमगाव खैरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २० लाखांचा निधी मंजू

सद्गुरू गंगागिरी महाराज सप्ताहासाठी भाविकांची वाट होणार सुकर

शिव वार्ता प्रतिनिधी : संदीप जगताप

श्रीरामपूर : तालुक्यातील निमगाव खैरी ते नाऊर या सुमारे ११ किलोमीटर रस्त्यापैकी ९ किलोमीटर रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासह साईडपट्टीची कामे आणि दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे हटविण्यात येणार असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांमुळे एसटी बससेवेवरही परिणाम झाला होता. परिणामी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह शेतकरी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. वैजापूर-श्रीरामपूरला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग देखील वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता.

नाऊर, निमगाव खैरी, श्रीरामपूर, रस्ता दुरुस्ती,

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नायगाव ग्रामस्थांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबारात मागणी मांडली होती. सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड, ॲड. सचिन राशिनकर, सरपंच डॉ. राजाराम राशिनकर, सुभाष लांडे, जाफराबादचे माजी सरपंच संदीप शेलार, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण भोसले, प्रमोद लांडे, राजेंद्र बुचुडे, अध्यक्ष सर्जेराव मुंडे तसेच सराला बेटाचे मधुकर महाराज आदींनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

अखेर विशेष बाब म्हणून ९ किलोमीटर रस्त्यावरील खड्डे मुरुमाने बुजविणे, दुतर्फा काटेरी बाभळी व झुडपे हटविणे, साईडपट्टी तयार करणे आणि मुरुमावर रोलिंग करण्यासाठी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सप्ताहामुळे वाढलेल्या वाहतुकीला मिळणार दिलासा

धनगरवाडी येथे सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून, या काळात पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याने सप्ताहासाठी येणाऱ्या भाविकांची वाट सुकर होणार आहे. यामुळे परिसरातील भाविकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

कायमस्वरूपी डांबरीकरणाची मागणी

या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांनी वेळोवेळी उपोषण व आंदोलने केली होती. तात्पुरत्या दुरुस्तीबरोबरच हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट करून त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण अथवा दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. कायमस्वरूपी रस्ता झाल्यास या परिसरातील नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

पाठपुराव्याला यश

सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड, ॲड. सचिन राशिनकर यांच्यासह नायगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जनता दरबारात रस्त्याची दुरवस्था मांडली होती. तसेच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी विशेष लक्ष घालून तातडीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

टाकळीभानमध्ये भेसळ तपासणीची चर्चा; दुकाने बंद, व्यावसायिकांमध्ये संभ्रम

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!