Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

टाकळीभान टेलटँक भरले; जलपूजनासाठी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ

टाकळीभान टेलटँक भरले; जलपूजनासाठी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ

शिव वार्ता प्रतिनिधी

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानसह परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला टाकळीभान टेलटँक (गोविंदसागर) पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या जलसाठ्याच्या जलपूजनाचे श्रेय घेण्यासाठी आता विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धडपड सुरू झाली आहे.

टेलटँक भरल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून रब्बी हंगामातील पिकांच्या नियोजनाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या जलसाठ्याचे जलपूजन आपल्या नेत्याच्या हस्ते व्हावे, यासाठी विविध पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे.

आपापल्या नेत्याच्या हस्ते जलपूजन करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू झाली असून, सोशल मीडिया तसेच स्थानिक पातळीवर याबाबत चर्चा रंगू लागली आहे. टेलटँक भरण्यामागे जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियोजन आणि परिश्रम महत्त्वाचे असताना, आता जलपूजनाच्या निमित्ताने राजकीय श्रेयवादाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांसाठी जलसाठा ठरला दिलासादायक

टाकळीभान टेलटँकची साठवण क्षमता सुमारे १९७ दशलक्ष घनफुट असून, या टेलटँकमुळे टाकळीभानसह परिसरातील सात ते आठ गावांच्या शेतीला आणि पाणीपुरवठा योजनांना मोठा फायदा होतो. टेलटँकमधून होणाऱ्या पाझरामुळे परिसरातील भूजलपातळीला आधार मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी हा जलसाठा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

भंडारदरा आणि निळवंडे धरणे भरल्यानंतर प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्याचे नियोजन करून ते टाकळीभान टेलटँकमध्ये सोडण्यात आले. जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे टेलटँक पूर्ण क्षमतेने भरला आहे.

जलपूजन कुणाच्या हस्ते? उत्सुकता वाढली

टेलटँक भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद असला तरी जलपूजनाचा कार्यक्रम कोण आयोजित करणार आणि कोणत्या नेत्याच्या हस्ते होणार, याकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे. विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या नेत्याच्या हस्ते जलपूजन व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याने आगामी काळात टेलटँकच्या जलपूजनाचा कार्यक्रम राजकीयदृष्ट्याही चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

पाणी सर्वांचे, पण जलपूजनाचे श्रेय कोणाचे? असा मिश्कील सवालही आता टाकळीभान परिसरात चर्चिला जात आहे.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!