नांदूर मध्यमेश्वर धरणातून 82 हजार क्युसेक विसर्ग; गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नाशिक | प्रतिनिधी
गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून आज (24 जुलै 2026) सकाळी 6.00 वाजल्यापासून 82,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याबाबत नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
यापूर्वी धरणातून 55,778 क्युसेक विसर्ग सुरू होता. मात्र पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन त्यामध्ये 26,222 क्युसेकांची वाढ करण्यात आली असून एकूण विसर्ग 82,000 क्युसेक करण्यात आला आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गोदावरी नदीपात्र तसेच नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने नदीपात्रातील साहित्य, जनावरे तसेच इतर मौल्यवान वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधित महसूल, आपत्ती व्यवस्थापन व स्थानिक प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.













