एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेते असलम इनामदार यांचा टाकळीभानमध्ये जल्लोषात सत्कार
शेतकरी संघटनेतर्फे भव्य गौरव सोहळा; ॲड. अजितदादा काळे व धावपटू भाऊसाहेब गव्हाणे यांच्या वतीने सन्मान
टाकळीभान | शिव वार्ता प्रतिनिधी
टाकळीभानचे भूमिपुत्र, शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू असलम इनामदार यांनी एशियन गेम्समध्ये दोन सुवर्णपदके पटकावत देशासह टाकळीभानचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल टाकळीभान ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात भव्य सत्कार सोहळा पार पडला.

शेतकरी लोकनेते ॲड. अजितदादा काळे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना तथा कायदेतज्ज्ञ, संभाजीनगर उच्च न्यायालय आणि आंतरराष्ट्रीय धावपटू भाऊसाहेब गव्हाणे यांच्या वतीने असलम इनामदार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
अहिल्यानगर शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या गौरव सोहळ्यास टाकळीभानमधील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आपल्या भूमिपुत्राच्या यशाचा आनंद साजरा केला. असलम इनामदार यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशाबद्दल ग्रामस्थांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत अभिमान व्यक्त केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी असलम इनामदार यांच्या संघर्षमय क्रीडा प्रवासाचे आणि उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले. त्यांच्या यशामुळे टाकळीभानसह परिसरातील युवा खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची नवी प्रेरणा मिळत असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
“जय जवान, जय किसान, जय शेतकरी संघटना!” या उत्स्फूर्त घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि जल्लोषपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचा समारोप झाला.अस्लम इनामदारचे सलग दुसरे आशियाई सुवर्णपदक













