आमचे बाप्पा… ऐतिहासिक देखाव्यात अष्टविनायकांचे दर्शन
टाकळीभान | शिव वार्ता प्रतिनिधी :
कल्पकता, भक्ती आणि ऐतिहासिक वारशाचा सुरेख संगम साधत लांडगे-आसने परिवाराने यंदाच्या गणेशोत्सवासाठी साकारलेला आकर्षक ऐतिहासिक देखावा परिसरातील गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे या देखाव्यात अष्टविनायक गणपतींचा समावेश करण्यात आल्याने धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाची अनुभूती एकाच ठिकाणी घेता येत आहे.

सालाबादप्रमाणे यंदाही लांडगे-आसने परिवाराच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन झाले आहे. भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, गणेशोत्सवानिमित्त आकर्षक ऐतिहासिक देखावा साकारण्यात आला आहे.
देखाव्यामध्ये महाराष्ट्रातील श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक गणपतींचाही समावेश करण्यात आला आहे. आकर्षक सजावट, बारकाईने केलेली मांडणी आणि देखाव्यातून साकारलेले धार्मिक वातावरण यामुळे हा देखावा विशेष उठून दिसत आहे.
हा देखावा साकारण्यासाठी बालचमु स्नेहल आसने, पार्थ लांडगे, पियुष आसने आणि छोटी आवंती लांडगे यांनी विशेष उत्साहाने सहभाग घेतला. तसेच छाया लांडगे, अभिजित लांडगे, शुभांगी लांडगे आणि सोनाली आसने यांनीही देखावा उभारण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
बालचमूंची कल्पकता आणि परिवारातील सदस्यांच्या मेहनतीतून साकारलेला हा देखावा यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत असून, ‘आमचे बाप्पा’ या संकल्पनेतून भक्ती, संस्कृती आणि इतिहासाचा सुंदर मिलाफ पाहायला मिळत आहे.
शिव वार्ताच्या वतीने या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात येत असून, अशा उपक्रमांमधून बालकांच्या अंगी असलेल्या कला, कल्पकता आणि सुप्त गुणांना वाव मिळतो. गणेशोत्सवासारख्या सांस्कृतिक उत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीला आपली कला सादर करण्याची, नवनिर्मिती करण्याची आणि संस्कृतीशी जोडले जाण्याची संधी मिळते. अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळाल्यास भविष्यातील कलाकार आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्वांना निश्चितच प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा ‘शिव वार्ता’च्या वतीने व्यक्त करण्यात आली.













