अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या; तहसीलदारांना निवेदन
श्रीरामपूर तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळण्याची मागणी
शिव वार्ता प्रतिनिधी ! हरिभाऊ बिडवे
श्रीरामपूर तालुक्यात सन २०२६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करूनही अद्याप नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार तातडीने नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर तालुक्यात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले असून, पात्र लाभार्थ्यांच्या याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असतानाही त्यांना अद्याप शासनाची नुकसानभरपाई मिळालेली नाही.

डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्यासह शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन.
शासकीय मदतीपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने संबंधित यंत्रणेकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती घेऊन प्रलंबित प्रकरणांची तातडीने पडताळणी करावी. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम लवकरात लवकर जमा करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून सकारात्मक व जलद कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
या निवेदनावर डॉ. वंदनाताई मुरकुटे, सुदामराव पटारे, भाऊसाहेब भोईटे, नामदेव शिंदे, विकास ढोकचोळे, रणजीत डांगे, अरुण जगधने, प्रभाकर राहींज, दिलीप पटारे, संतोष चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.कर्जमुक्ती योजनेतून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्या
यावेळी अनिल औताडे, युवराज जगताप, डॉ. आदिक, डॉ. विकास नवले, साहेबराव चोरमल, नंदू खेमनर, सचिन राऊत, काका सावे, गणेश सावे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













