सोशल मीडियावर जातीय टिप्पणी; खिर्डीतील तरुणावर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
खिर्डीतील तरुणावर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथील एका तरुणाविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह, जातीय भावना दुखावणारी आणि समाजात तेढ निर्माण करणारी टिप्पणी केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरील जबाबदार वर्तनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, योगेश उर्फ मिधु फक्कडराव पिसाळ (वय ४२, रा. खिर्डी, ता. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शंकर विजय रणनवरे (वय २६, रा. टाकळीभान) यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, १० जुलै रोजी सकाळी सुमारे ९.४३ वाजता ते एसटी स्टँड परिसरात असताना मोबाईलवरील इंस्टाग्रामवर धनगर समाजाच्या गंगाखेड येथील मोर्चासंदर्भातील एक व्हिडिओ पाहत होते. त्या व्हिडिओवरील कमेंट्स वाचत असताना आरोपीने कथितरीत्या जातिवाचक व आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संबंधित टिप्पणीमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच ही बाब गावातील समाजबांधवांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित समाजाच्या भावना दुखावल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. श्रीरामपूरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर
तक्रारीच्या आधारे श्रीरामपूर तालुका पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५३, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० चे कलम ६७, तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत लागू असलेल्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून संबंधित सोशल मीडिया पोस्ट, कमेंट्स आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.













