टाकळीभान उपबाजार आवारात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन; व्यापारी व ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती
कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीरामपूरच्या टाकळीभान उपबाजार आवारात जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण; समता, सामाजिक न्याय आणि कष्टकरी समाजासाठीच्या कार्याला उजाळा
शिव वार्ता प्रतिनिधी!बापूसाहेब नवले
साहित्यसम्राट तथा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीरामपूरच्या टाकळीभान उपबाजार आवारात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. सामाजिक समता, न्याय आणि कष्टकरी समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात बाजार समितीचे संचालक श्री. मयुर पटारे, श्रीमती विद्याताई दाभाडे तसेच शाखाधिकारी श्री. दिनकर पवार यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी वक्त्यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणी आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश त्यांनी आपल्या साहित्य आणि लोककलेतून समाजापर्यंत पोहोचवला. त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही समाजाला दिशा देणारी आहे. [अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी]
या कार्यक्रमास परिसरातील व्यापारी, शेतकरी, ग्रामस्थ तसेच बाजार समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.












