श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर परिसरात महावितरणच्या मेन लाईनवरील दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून कंत्राटी वायरमन गणेश बाळासाहेब थोरात (वय २८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवार (दि. ३० जून) रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर येथील महावितरणच्या सबस्टेशनच्या मागील बाजूस मेन लाईनवर काम सुरू असताना अचानक विद्युतप्रवाह सुरू झाल्याने गणेश थोरात यांना जोरदार विजेचा धक्का बसला. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर नेमका विद्युतप्रवाह कसा सुरू राहिला, काम सुरू असताना आवश्यक सुरक्षितता उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, तसेच या दुर्घटनेमागे निष्काळजीपणा झाला का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.
गणेश थोरात हे महावितरणमध्ये कंत्राटी पद्धतीने वायरमन म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अकाली निधनामुळे थोरात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बेलापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.













